जळगाव : शहर भाजपमध्ये महानगराध्यक्ष पदासाठी सध्या मोठी चुरस सुरू असून, या निवडीने पक्षात स्पष्ट गटबाजी निर्माण झाली आहे. दीपक सुर्यवंशी आणि रोहित निकम ही दोन नावे सध्या आघाडीवर असली तरी, दोघांमधील तीव्र विरोधामुळे पक्ष नेतेमंडळींच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळेच मराठा समाजातून "तिसऱ्या पर्यायाची" शक्यता जोर धरू लागली आहे.
गेल्या आठवड्यात पक्ष निरीक्षकांनी जळगाव शहर दौरा करून विविध पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यावेळी सुर्यवंशी आणि निकम या दोघांनी आपापली बाजू मांडत एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका केली. या चढाओढीत भाजप महानगर संघटना दोन गटांत विभागली गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
ही घमासान थेट जलसंपदामंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या कानावर गेली असून, त्यांनीही दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतल्याची माहिती सुत्रांकडून समजते. पक्षांतर्गत वाढलेले मतभेद पाहता नेतृत्व 'तिसरा' पर्याय रेटण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. हा पर्याय मराठा समाजातून असण्याची शक्यता असून, तो व्यक्ती पक्षनिष्ठ, संघटनात्मक अनुभव असलेला आणि निवडणूक व्यवस्थापनात पारंगत असावा, असे निकष सध्या विचाराधीन आहेत.
भाजपसाठी ही निवड प्रतिष्ठेची ठरणार आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शहराध्यक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. आता सर्वांच्या नजरा पक्षाकडून पुढे येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या चेहऱ्यावर खिळल्या आहेत.
या घडामोडींनी पक्षाच्या अंतर्गत गणितांमध्ये नव्याने हालचाली सुरू झाल्याचं स्पष्ट आहे, आणि त्यामुळे पुढील काही दिवस भाजपच्या जळगाव महानगरात राजकीय हालचालींना उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
BJP, Jalgaon Politics, Deepak Suryawanshi, Rohit Nikam, Girish Mahajan, Maratha Community, Party Leadership, Political Rivalry, Maharashtra Politics, City President Selection
0 टिप्पण्या