जळगाव न्यूज : साकळी -अक्षय्य तृतीयेनिमित्त यावल तालुक्यातील साकळी येथे ग्रामदैवत भवानीमातेची पारंपरिक यात्रा आज दिनांक ३० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा लाभली असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यात्रेनिमित्त साकळी गावात दोन ठिकाणी बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. यात्रोत्सव भवानीमातेच्या मंदिर परिसरात साजरा केला जातो. मंदिराचा गाभारा व परिसर स्वच्छ करून फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई व ध्वजपताकांनी आकर्षक सजावट केली जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल रोजी सकाळी देवीला महाअभिषेक केला जाईल. त्यानंतर सायंकाळी भवानीमाता मंदिरासमोर भगत संतोष सुरेश महाजन यांच्या हस्ते पहिली बारागाडा ओढली जाईल. दुसऱ्या दिवशी, १ मे रोजी भगत हरदुल लाला यांच्या स्मृतीनिमित्त भगत विशाल दिलीप लोधी हे जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर बारागाडा ओढतील. त्यानंतर देवीच्या वाहनांची भव्य मिरवणूक काढली जाईल.
चोख व्यवस्था आणि सुरक्षा
बारागाड्यांच्या मार्गांची स्वच्छता व इतर तयारी ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यात्रोत्सवासाठी पोलिस बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळाचे नेतृत्व
श्री भवानीमाता मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अशोक चौधरी असून, मंडळात भिका पाटील, काशिनाथ पवार, संजय पाटील, पांडुरंग निळे, प्रल्हाद पाटील, भगवान शिरसाळे, नितीन महाजन, भागवत रावते, सुधाकर बाविस्कर, भास्कर तायडे, अरुण कोळी, निंबा पाटील, पंडित पाटील, पंडित मराठे, नूतनराज बडगुजर, नीलेश बोरसे आणि मयूर मराठे यांचा समावेश आहे.
0 टिप्पण्या