Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Yawal News : सिनेस्टाइल कारवाई! चालक पळाला, कोतवालाची शौर्यगाथा: वाळूच्या डंपरला थांबवून गाव वाचवले

JALGAON NEWS दहिगाव, ता. यावल :- सावखेडासीम (ता. यावल) येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर सिनेस्टाइल पाठलागानंतर महसूल पथकाने पकडला. डंपरचा चालक पथक पाहताच पळून गेला, मात्र गावाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेला डंपर थांबवण्यासाठी कोतवाल विजय साळवे यांनी जिवाची पर्वा न करता स्टिअरिंग हातात धरले आणि मोठा अनर्थ टाळला.


२८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता यावल मंडळ अधिकारी मीना तडवी यांच्या पथकाने डंपरचा पाठलाग सुरू केला. डंपरचा चालक यावल शहर न गाठता सावखेडासीमकडे वळला. मोहराळे रस्त्यावरील उतारावर त्याने डंपरचा वेग कमी करत उडी मारून पलायन केले.

याच दरम्यान, गावठाणावर बसलेले ग्रामस्थ डंपर त्यांच्या दिशेने येताना पाहून घाबरले. त्याक्षणी कोतवाल विजय साळवे यांनी चारचाकी चालवता न येत असूनही डंपरमध्ये शिरून स्टिअरिंगवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अंदाजे तीनशे फूट अंतर डंपर चालवून त्यांनी तो गावातील गटारावरील संरक्षण भिंतीवर आदळला आणि थांबवला. या थरारक घटनेत ग्रामस्थ बचावले आणि मोठा अपघात टळला.

या घटनेत डंपर आणि संरक्षण भिंतीचे नुकसान झाले असले तरी कोतवालाच्या धाडसामुळे अनेक जीव वाचले. अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाचे कारवाईचे चक्र आता अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.

धाडसी कोतवाल विजय साळवे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू असून, त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या