सावदा : फैजपूर-आमोदा रस्त्यावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपरूड फाटा परिसरात दोन रिक्षांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत सातवीतील विद्यार्थिनी आदिती सोपान खडसे (वय १३, रा. सावदा) हिचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन विद्यार्थी, चालक व इतर प्रवाशांचा समावेश आहे.
अपघात इतका भीषण होता की आदितीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ती सावदा येथील दंतरोग तज्ज्ञ डॉ. सोपान खडसे यांची मुलगी होती. दरम्यान, पाच जखमींमध्ये सार्थ शंतनू सरोदे (डॉ. शंतनू सरोदे यांचा मुलगा), ओझल संदीप पाटील (शिक्षक संदीप पाटील यांची मुलगी), रिक्षाचालक व इतर दोन प्रवाशांचा समावेश आहे.
अपघाताची घटना अशी घडली की, सावदा येथून भुसावळकडे प्रवासी घेऊन निघालेली ॲपेरिक्षा (MH 19 CV 3590) आणि समोरून लाकडांनी भरलेली मालवाहू ॲपेरिक्षा (MH 19 7064) यांच्यात पिंपरूड फाटा व आमोदा दरम्यान जोरदार धडक झाली. त्यामुळे रिक्षातील विद्यार्थी व प्रवाशांचा मोठा अनर्थ झाला.
विशेष म्हणजे, अपघातात मृत व जखमी झालेले विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून 'पेस आयआयटी इन्स्टिट्यूशन' (Pace IIT Institution) या खासगी संस्थेत JEE व NEETसाठी तयारी करत होते. या विद्यार्थ्यांचे यंदाचे दुसरे वर्ष होते. सध्या १ मे ते १५ मे या कालावधीत संस्थेच्या भुसावळ शाखेत राष्ट्रीय स्तरावरील अभ्यास शिबिर भरवण्यात येत असून या शिबिरासाठी हे विद्यार्थी दररोज भुसावळला ये-जा करत होते.
दुर्दैव म्हणजे आज त्यांच्या भुसावळच्या अभ्यास प्रवासाचा चौथा दिवस होता, पण रस्त्यावरच्या अपघाताने हा अभ्यासाचा प्रवास कायमचा थांबवला.
0 टिप्पण्या