Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS: जिल्ह्यात ११ ‘बहिणाबाई मार्ट’ प्रकल्पांची घोषणा – महिला बचत गटांना थेट बाजारपेठेचा लाभ

JALGAON NEWS | जळगाव – जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बहिणाबाई मार्ट’ या नावाने जिल्ह्यात ११ ठिकाणी विक्री केंद्रे स्थापन केली जाणार असून, या प्रकल्पासाठी तब्बल २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारात थेट विक्रीची संधी मिळणार आहे.



पिंप्री येथे त्रिवेणी संगम महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली. पिंप्री येथेही ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यात येणार असून, स्थानिक महिलांना रोजगार आणि व्यवसायवृद्धीस चालना मिळणार आहे.

त्रिवेणी संगम महिला प्रभाग संघात ३१ ग्रामपंचायती आणि ३२ ग्राम संघांचे प्रतिनिधित्व असून, या बैठकीत बचत गटांच्या वर्षभरातील कर्जवाटप, निधीचा विनियोग, व व्यवसायवाढीचा आढावा घेण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील महिला गटांना गेल्या दोन वर्षांत ७२४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, बचत गटांनी पारंपरिक गोष्टींपलीकडे जाऊन नावीन्यपूर्ण वैयक्तिक व्यवसाय हाती घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

‘बहिणाबाई मार्ट’ प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना स्थानिक आणि जिल्हास्तरावर स्वतःची उत्पादने विक्रीस ठेवता येणार आहेत. हे केंद्र त्यांच्या उत्पादनांच्या ब्रँडिंग, पॅकिंग व विपणनासाठीही प्रभावी ठरणार आहेत.

या निर्णयामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या