जळगाव न्यूज : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने अनिल थत्ते यांना त्यांच्या सोशल मीडियावरील सर्व संबंधित व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणात गंभीर दखल घेतली आहे.
अनिल थत्ते यांनी त्यांच्या एका व्हिडिओमधून गिरीश महाजन यांच्यावर एका महिला IAS अधिकाऱ्याशी कथित संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर एकनाथ खडसे यांनी देखील महाजन यांच्यावर टीका करत आरोपाला राजकीय रंग दिला होता. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी या दोघांविरोधात कायदेशीर पावले उचलत अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती.
महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले की, थत्ते आणि खडसे यांनी कोणताही ठोस पुरावा न देता खोटे व निराधार आरोप करून त्यांच्या सामाजिक व राजकीय प्रतिमेला हानी पोहोचवली आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
दुसरीकडे, अनिल थत्ते यांनी सांगितले की त्यांच्या मूळ व्हिडिओचा राजकीय हेतूने विपर्यास करण्यात आला आहे आणि त्यांनी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. ते आपली बाजू कोर्टात मांडण्यास तयार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
एकनाथ खडसे यांनी मात्र अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस प्राप्त झाल्याचे नाकारले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नोटीस मिळाल्यानंतरच ते यावर प्रतिक्रिया देतील.
या संपूर्ण प्रकरणामुळे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील जुना राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोघेही पूर्वी भाजपमध्ये एकत्र होते, मात्र सध्या वेगवेगळ्या पक्षांत असून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजकारणातील संघर्ष आता वैयक्तिक आयुष्यातही पोहोचल्याचे या प्रकरणातून दिसून येते.
0 टिप्पण्या