![]() |
जळगाव महापालिका वातावरणीय बदल रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करणार. |
जळगाव – गेल्या काही महिन्यांत शहराच्या वातावरणात झपाट्याने बदल होत असून, त्यामुळे तापमानवाढ, प्रदूषण आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेतर्फे वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करण्यासाठी विशेष शहरस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने यासाठी अहमदाबादच्या महिला हौसिंग ट्रस्ट या संस्थेशी करार केला असून, ट्रस्ट वर्षभर शहरातील प्रदूषण, धूर, वायू उत्सर्जन, दुर्गंधीचे प्रमाण, जळणाचे स्रोत यांचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर त्या आधारे उपाययोजना सुचवणारा अहवाल महापालिकेला दिला जाणार आहे.
समितीत उपायुक्त, सहायक आयुक्त, पर्यावरण तज्ज्ञ, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, भू-अभ्यासक व अन्य १३ सदस्यांचा समावेश आहे.
कूल बसस्थानक उभारण्याचाही प्रस्ताव महिला हौसिंग ट्रस्टने दिला असून, उन्हाळ्यात प्रवाशांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी बसस्थानकावर कूलिंग यंत्रणा बसवण्याची सूचना केली आहे. यासाठी अंदाजे ३३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारची यंत्रणा अहमदाबाद व नागपूरमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहे.
महापालिकेत नुकत्याच झालेल्या बैठकीत आर्किटेक्ट, पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व कंपन्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी वातावरणीय बदलावर उपायांची मांडणी केली असून, लवकरच अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे.
0 टिप्पण्या