![]() |
भुसावळ विभागातील सात रेल्वे स्थानकांवर दररोज बॉम्बशोधक तपासणी केली जाणार आहे. |
जळगाव – भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. विभागातील जळगाव, भुसावळ, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला आणि बडनेरा या सात प्रमुख स्थानकांवर आता दररोज बॉम्बशोधक पथकांकडून तपासणी केली जाणार आहे.
रेल्वे सुरक्षा बल (RPF) या पथकांना अत्याधुनिक उपकरणे व शस्त्रे देऊन सज्ज केले आहे. या यंत्रणेच्या मदतीने संशयास्पद वस्तू, स्फोटके अथवा धोकादायक साहित्य ओळखता येते. शनिवारी मलकापूर स्थानकावर बॉम्बशोधक पथकाने कसून तपासणी केली असता, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून दररोज दिवसातून तीन वेळा सशस्त्र गस्त आणि रूटमार्च फलाटांवर घेतला जात आहे. यामुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. RPF चे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी हे रोजच्या घडामोडींचा आढावा घेऊन सुरक्षा व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करत आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे व बॅग तपासणीदरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवास करताना प्रत्येकाने सतर्कता बाळगावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा बलाकडून सततची नजर ठेवली जात असून, कोणतीही शंका असेल तर तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या