मृत तरुणाचे नाव आकाश पंडीत भावसार (सोनार) असून तो अयोध्या नगर, जळगाव येथे राहणारा होता. ट्रान्सपोर्ट नगरात गाड्या भरण्याचे एजंट म्हणून तो काम करत होता. त्याच्या मागे आई, पत्नी आणि दोन चिमुरडी मुले असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाशचा त्याच्या पत्नी आणि सासरच्यांशी गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. पत्नी वारंवार माहेरी जात होती आणि काही काळापासून दोघं वेगळं राहू लागले होते. शनिवारी रात्री आकाशला त्याच्या सासरच्या नातेवाइकांनी हॉटेल ए वन जवळ गाठले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर वार केले. एवढ्यावरच न थांबता दोन राउंड गोळ्याही झाडण्यात आल्या.
गंभीर जखमी अवस्थेत आकाशला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणात ४ संशयित आरोपींची नावे समोर आली असून त्यांचा शोध सुरु आहे.
या खुनामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन निरागस मुलांचे पितृछत्र हरपले आहे. पोलीस तपासात पुढील धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 टिप्पण्या