भुसावळ – दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील वेल्हाळे ॲश पॉडमधून तब्बल ५० टन राखेची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील ट्रक (एमएच १५ जेसी ९३९६) मध्ये ९,६५० रुपये किमतीची राख भरून नेत असताना ८ मे रोजी रात्री ८ वाजता किन्ही चौफुलीवर ट्रक पकडण्यात आला.
महानिर्मिती इतिहासात प्रथमच राख चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दीपनगर केंद्राच्या उपकार्यकारी अभियंता माधव गोविंदराव केंद्रे (वय ३५, रा. दीपनगर) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. आरोपी चालक विजय शिवराम माळी (रा. वडनेर दुमळा, ता. व जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो वाहन सोडून पसार झाला आहे.
राखेच्या पॉडचा लिलाव करुन कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, कोणतीही परवानगी न घेता बंडातून राख उचलून वाहतूक करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व मोफत उचल करणाऱ्या पुरवठादारांवरही कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास हवालदार कैलास बाविस्कर करीत आहेत. ही घटना राखेच्या व्यवस्थापनातील सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे.
0 टिप्पण्या