भुसावळ – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व परिसरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे आणि तालुका पोलिस ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील उपद्रवी प्रवृत्तीच्या १२ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये प्रथमच दोन तृतीयपंथीयांचाही समावेश करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेकडून या व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून, त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती गोळा करून त्याचा आढावा घेतला जात आहे. उपद्रव निर्माण करणाऱ्या, वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि स्थानिक वातावरण बिघडवणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून ही प्रस्ताव प्रक्रिया सुरू आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी अशा उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले जात असून, येत्या १५ दिवसांत हे प्रस्ताव पूर्ण करून प्रांत अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहेत. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित आरोपींना हद्दपारी करण्यात येईल.
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात शांतता आणि सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सातत्याने कार्यरत असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही निर्णायक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या हालचालीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेचं सर्वत्र स्वागत होत आहे. हद्दपारी ही एक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारीला आळा बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या