जळगाव – उष्णतेने हैराण करणाऱ्या उन्हामुळे जिल्ह्यात उष्माघातसदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या अवघ्या सहा दिवसांत जिल्ह्यात अशा तब्बल ३२ रुग्णांची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पोर्टलवर करण्यात आली आहे. ही आकडेवारी चिंतेची असून, उन्हाळ्यात आरोग्यविषयक धोके किती गंभीर होत चालले आहेत, याचे हे ठोस उदाहरण आहे.
यंदाच्या एप्रिल महिन्यातच तापमानाने चाळिशीचा आकडा पार केला. आता मे महिन्यात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र जाणवत असून, थेट आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. या सहा दिवसांत नोंद झालेल्या ३२ रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे १३ जणांना 'हीट रॅश' — अंगावर पुरळ येणे — हा त्रास झाला. त्यानंतर ८ जणांना पायात गोळे येणे व अशक्तपणा जाणवला, तर ११ जणांना शरीरातील पाणी कमी होण्याची तक्रार आढळून आली.
सदर सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. विशेष म्हणजे अजून एकाही रुग्णाला पूर्ण उष्माघात झाल्याची नोंद नाही, मात्र हीटस्ट्रोकसदृश लक्षणे दिसून येत असल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बाब अशी की, जळगाव शहरात मनपा प्रशासनाकडे या रुग्णांची एकही नोंद झालेली नाही. प्रत्यक्षात शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये ओपीडीमध्ये २० ते २५ टक्के रुग्ण उष्णतेमुळे प्रभावित होत असल्याचे डॉक्टर सांगतात. मात्र, या खासगी रुग्णालयांमधील रुग्णांची कुठेही अधिकृत नोंद होत नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य आरोग्य यंत्रणांपासून लपून राहत आहे.
जिल्हा प्रशासन व मनपा यंत्रणांनी तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा उष्माघाताचे प्रमाण अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते.
0 टिप्पण्या