जळगाव शहरातील शनिपेठ भागातील कांचनगर परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या फायरिंगमध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतले असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जळगाव (Jalgaon News : — जळगाव शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. शनिपेठ विभागातील कांचनगर भागात रात्री साडेदहाच्या सुमारास दोन गटांमध्ये गोळीबार झाला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
घटनेच्या संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी सांगितले की, “रात्री सुमारे १०.३० वाजता कांचनगर भागात फायरिंगची घटना घडली. या प्रकरणातील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. यातील काही आरोपींना पूर्वी हद्दपार देखील करण्यात आले होते. या घटनेमागे अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
फायरिंगमध्ये मृत व्यक्तीची ओळख आकाश बाविस्कर अशी झाली असून, त्याच्याविरोधातही पूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत आणखी तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कांचनगर आणि शनिपेठ परिसरात अतिरिक्त पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे गणापुरे यांनी सांगितले. “मुख्य आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतले असून इतर दोघा आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करून रवाना करण्यात आले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांनी आवाहन केले.
दरम्यान, आकाश बाविस्कर आणि त्याच्या सहकाऱ्यांमधील जुन्या वादातून ही फायरिंग झाल्याची शक्यता पोलिस तपासातून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे शनिपेठ आणि आसपासचा परिसर पुन्हा एकदा पोलिसांच्या उपस्थितीने गजबजलेला आहे. तपास पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली सुरू असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
#JalgaonNews #JalgaonCrime #Gunfire #Shanipeth #Kanchanagar #PoliceAction #NitinGanapure #JalgaonBreaking #MaharashtraCrime #Jalgaon
.png)
0 टिप्पण्या