YAWAL ACCIDENT NEWS : यावल तालुक्यातील वढोदे गावाजवळ यावल-चोपडा राज्य महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या अपघातात एका अंदाजे ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना वढोदे गावातील बेहेडे कृषी केंद्राजवळ घडली. गुरुवारी रात्री एक अज्ञात वाहन भरधाव वेगात जात असताना या व्यक्तीस जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला. मात्र रात्रीच्या वेळेस व निर्जन परिसर असल्याने कुणाच्याही निदर्शनास ही घटना आली नाही.
शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर मृतावस्थेत पडलेली व्यक्ती पाहिल्यानंतर यावल पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृताला यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी वढोदे गावचे रहिवासी मुकुंद बहादुर बारेला यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले असून, आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व वाहनांबाबतची माहिती घेतली जात आहे.
या अपघातामुळे यावल-चोपडा महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्रीच्या वेळी महामार्गावरील अंधार, वाहने चालवताना घेतली जाणारी बेफिकीरी आणि वेग मर्यादा ओलांडल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते. पोलिसांनी वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या