YAWAL NEWS : तापी परिसर विद्यामंडळ संचलित फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहाच्या बांधकामातील अपहार प्रकरणात यावल न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सदर प्रकरणातील तपास चुकीच्या पद्धतीने केल्याबद्दल तत्कालीन तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) देवेंद्र शिंदे यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर प्रकरण २००६-०७ मध्ये घडले असून यु.जी.सी.च्या अनुदानातून मुलींच्या वसतीगृहाचे ४८ खोल्यांचे मंजूर बांधकाम प्रत्यक्षात ४० खोल्यांपुरतेच करण्यात आले. मात्र यु.जी.सी.कडे बनावट सर्टिफिकेट सादर करून संपूर्ण अनुदान वसूल करण्यात आले. यामुळे एकूण ₹1.58 कोटींपेक्षा अधिक खर्च दाखवण्यात आला होता. हे प्रकरण कै. प्रा. के. व्ही. झांबरे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांवरून उजेडात आणले होते.
२०१२ साली यावल न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करून न्यायालयाने कलम १५६ (३) अंतर्गत फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र डीवायएसपी देवेंद्र शिंदे यांनी ‘ब’ समरी अहवाल सादर करत गुन्हा नाकारला होता. यावर न्यायालयाने ती समरी फेटाळून आरोपींविरुद्ध प्रोसेस इश्युचे आदेश दिले. तसेच तपासात कसूर दाखवणाऱ्या शिंदे यांच्या चौकशीसाठी पोलिस अधिक्षकांना निर्देश दिले.
सर्वोच्च न्यायालयानेही यावल न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यामुळे आता या प्रकरणात खटला नियमित फौजदारी खटल्याप्रमाणे चालवला जाणार आहे. एकूण २१ आरोपींपैकी काहींचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात आली. उर्वरित आरोपींपैकी ८ जणांवर कलम ४०६, ४०८, ४०९, ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७७ (अ), १२० (ब) आदी अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्राबरोबर पोलिस यंत्रणेतही खळबळ उडाली असून न्यायालयाच्या या निर्णयाने अपहार प्रकरणातील न्यायासाठी लढा देणाऱ्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
0 टिप्पण्या