यावल - यावल तालुक्यातील चुंचाळे गावचा जवान सुरेश मयाराम धनगर याने आपल्या कुटुंबातील लग्नसमारंभासाठी महिनाभराची सुटी घेतली होती. तो ८ मे रोजी गावी आला होता. मात्र, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सुरेशलाही परत नियुक्तीच्या ठिकाणी जाण्याचा आदेश मिळाला आहे.
सुरेश धनगर २००५ पासून सीआयसीरमीरमध्ये कार्यरत असून तो दोन दिवसांपूर्वीच घरी परतला होता. सुटीतील आनंद साजरा करण्याआधीच त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी रवाना व्हावे लागले. भुसावळ रेल्वे स्थानकावर त्याला निरोप देण्यासाठी आई-वडील, पत्नी, बहिण व भाचा उपस्थित होते. देशासाठी योगदान देताना सुरेश म्हणाला, “या स्थितीत माझी गरज कुटुंबापेक्षा देशाच्या सीमेवर जास्त आहे. भारतीय जनतेचा पाठिंबा हेच आमचं बळ आहे.”
दुसरीकडे, तालुक्यातील विरावली गावातील जवान महेंद्र पाटील यांना देखील कुटुंबातील दोन लग्नसमारंभासाठी गावाकडे परतायचे होते. त्यांनी आरक्षण केले होते, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांनी देखील आरक्षण रद्द करत कर्तव्यालाच प्राधान्य दिले.
या जवानांच्या देशप्रेमाने परिसरात अभिमानाचे वातावरण आहे. कुटुंबीयांनी हसत-हसत निरोप दिला, पण त्यांच्या डोळ्यातून अभिमानाश्रू ओघळत होते. सुट्टीत गावी आलेल्या जवानाने दोन दिवसांतच देशसेवेसाठी परत प्रयाण केले.
0 टिप्पण्या