जळगाव – अल्पवयीन मुलांच्या मोबाईल वापरातील अतिरेकामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आणखी एक गंभीर उदाहरण जळगाव शहरात पाहायला मिळाले. शहरातील जिजाऊनगर परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलाने आईने मोबाईल खेळण्यास मज्जाव केल्याने थेट घर सोडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
गिरणा पंपिंग रस्त्यावरील जिजाऊनगरात कमलेश झंडूराम कुदाल (वय ३८) हे पत्नी व एकुलत्या एक मुलगा मयंक उर्फ बिट्टू (वय १३ वर्ष ५ महिने) यांच्यासह वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. मयंकची आई आजारी असल्यामुळे झोपेत होत्या. त्या वेळी मयंक मोबाईलवर गेम खेळत होता. दुपारी २.३० वाजता आईने त्याला 'किती वेळ मोबाईल खेळतो?' असे विचारून मोबाईल काढून घेतला आणि पुन्हा झोपून गेल्या.
सुमारे दीड तासानंतर म्हणजेच चार वाजता जाग आल्यावर त्यांनी मयंकला हाक मारली, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने घरभर शोधाशोध सुरू केली. मयंक कुठेही न सापडल्याने अधिक बारकाईने पाहणी केली असता घरातून त्याचा सँग व काही कपडेही गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
पालकत्वाच्या दृष्टीने ही घटना अत्यंत चिंताजनक असून, मोबाईलच्या अति वापरामुळे अल्पवयीन मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या चिडचिडेपणाची आणि भावनिक अस्थैर्याची तीव्रता यातून स्पष्ट होते. पोलिसांनी त्वरित शोधमोहीम सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.
मयंकने घर सोडण्यामागचे नेमके कारण आणि तो सध्या कुठे आहे, हे अद्याप अस्पष्ट असून, पालक व नातेवाईक चिंतेत आहेत. या घटनेने पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे.
0 टिप्पण्या