भुसावळ - भुसावळ शहरात गेल्या चार वर्षांपासून रखडलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अखेर मार्गी लागले असून, आता संपूर्ण शहर ‘तिसऱ्या डोळ्या’खाली येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4 कोटी रुपयांच्या निधीतून शहरात 142 ठिकाणी एकूण 442 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.
या उपक्रमामुळे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठा आधार मिळणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे कॅमेरे कार्यान्वित होतील, अशी माहिती मिळाली आहे.
नियोजनानुसार, उत्तर दिशेला तापी नदीपासून ते दक्षिणेतील नाहाटा कॉलेज, पश्चिमेच्या ट्रामा केअर सेंटरपासून ते पूर्वेकडील वरणगाव रोड आणि खडका रोड परिसरात संवेदनशील भागांमध्ये हे कॅमेरे बसवले जात आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील प्रमुख चौक, सार्वजनिक स्थळे, बाजारपेठा, पोलिस ठाणी आणि रहदारीच्या मार्गांवर 24 तास नजर ठेवली जाणार आहे.
हंबर्डीकर चौक, ओंकारेश्वर मंदिर, महाराणा प्रताप चौक, शहर पोलिस ठाणे परिसर, बाबासाहेब आंबेडकर मैदान, लोणारी हॉल, इंद्रप्रस्थ नगर, रेल्वे नॉर्थ कॉलनी, महात्मा फुले नगर यांसारख्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच बसस्थानक, खडका चौफुली, स्टेशन चौकी, एमआयडीसी गेट, बालाजी तोल काटा, वांजोळा रोड येथेही काम वेगात सुरू आहे.
या सर्व ठिकाणी अत्याधुनिक कॅमेरे बसवले जात असून, त्यातून थेट कंट्रोल रूमला फीड मिळणार आहे. त्यामुळे चोरी, दंगली, वाहतूक विस्कळीत होणे यांसारख्या घटनांवर त्वरीत कारवाई शक्य होणार आहे.
भुसावळसारख्या वाढत्या शहरीकरणाच्या शहरात ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. नागरिकांचे सुरक्षेचे भान आणि पोलिस यंत्रणेची गती दोन्ही यातून वाढणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा प्रकल्प मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या