पिंप्रीतील ७१ विद्यार्थी मधुमेहाच्या उंबरठ्यावर; शाळांमध्ये तपासणी मोहीम जूनपासून
धरणगाव - तालुक्यातील पिंप्री येथील शाळांतील ७१ विद्यार्थी प्री-डायबेटीक म्हणजेच मधुमेहाच्या उंबरठ्यावर असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या २४२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ७१ विद्यार्थी मधुमेहपूर्व स्थितीत असल्याचे आढळले.
या गंभीर आरोग्यविषयक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एका शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तपासणी व्हिल्स ग्लोबल फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे.
करनवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जंकफूडच्या वाढत्या सेवनामुळे लहान वयातच मुलांमध्ये मधुमेहासारखे गंभीर विकार दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांच्या आहारात बदल घडवून आणण्यासाठी जनजागृती मोहिमेची आवश्यकता आहे. पालकांनी मुलांना भाकरी, फळे, भाज्या व फायबरयुक्त पदार्थ खाण्याची सवय लावली पाहिजे. यामुळे मधुमेहपूर्व स्थितीतील विद्यार्थीही आरोग्यदृष्ट्या सुधारू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाआधी नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये यशस्वी अंमलबजावणी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. जळगाव जिल्ह्यातही या तपासणीमुळे लहान वयातील आरोग्य समस्यांचे निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
या उपक्रमातून जिल्हा परिषदेचा उद्देश विद्यार्थ्यांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, तसेच आहाराविषयी योग्य मार्गदर्शन देऊन भविष्यकाळात मोठ्या आरोग्य समस्यांना अटकाव घालणे असा आहे. हा उपक्रम एक नवीन आरोग्यविषयक शैक्षणिक क्रांती ठरण्याची शक्यता असून, जिल्ह्याच्या आरोग्यदृष्ट्या उज्वल भविष्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
0 टिप्पण्या