जळगाव | जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण पशुधनासाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर करून ३३ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये 'खोडा शेड' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ही महत्वाची योजना आकाराला आली आहे.
जिल्ह्यात एकूण १५२ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. यापैकी ७८ ठिकाणी आधीच खोडा शेड उपलब्ध असून, आता उर्वरित ७४पैकी ३३ दवाखान्यांना हे शेड मिळणार आहेत. उर्वरित ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुविधा पुरवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ग्रामीण भागात पशुधन हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र, उपचारासाठी येणाऱ्या जनावरांना अनेकदा उन्ह, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण नसते. अशा वेळी उपचार अडथळले जातात किंवा जनावरांचे हाल होतात. खोडा शेडमुळे जनावरांना आरामदायी व सुरक्षित जागा मिळणार असून, उपचार सुलभ आणि वेळेत होतील.
या उपक्रमामुळे पशुधनासाठी काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेला मोठा दिलासा मिळणार आहे. पशुपालक शेतकरी वर्गाच्यादृष्टीने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या