जळगाव : “भारतच जगाला जगण्याचा मार्ग दाखवू शकतो, आणि तो मार्ग हिंदुत्वातूनच मिळू शकतो,” असे परखड मत भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी रविवारी व्यक्त केले. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आयोजित आदि शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, खासदार स्मिता वाघ, डॉ. भरत अमळकर, डीआरएम इति पांडेय, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड आणि नितीन पारगावकर यांची उपस्थिती होती.
देवधर म्हणाले की, अनादी काळापासून भारतीय संस्कृती टिकून आहे. युरोप-अमेरिकेच्या शिक्षण पद्धतीतून चुकीच्या संकल्पना आमच्यावर लादल्या गेल्या आणि आम्ही पाश्चिमात्य विकृतींचे अंधानुकरण सुरू केले. परिणामी, आमच्या समाजात अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले. मात्र आता पाश्चिमात्य समाजालाही समजले आहे की, खरा मार्ग भारतीय संस्कृतीतूनच मिळतो. इंग्रजी भाषेत गीतेचे वाचन करणारे भारतीय संत हेच आज युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियातील लोकांसाठी गुरू बनले आहेत.
मुस्लिम समाजावर भाष्य करताना देवधर म्हणाले की, मुस्लिम पैगंबरांनी स्वतः सांगितले आहे की, जिथे हिंदू बहुसंख्य आहेत तिथे शांतपणे रहा आणि जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे मुस्लिम राष्ट्र स्थापन करा. आज बांगलादेश, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार गंभीर स्वरूपाचे आहेत. हे वागणे विनाशकारक आणि विघातक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इशान्य भारतात राष्ट्रीय एकात्मतेसाठी मोठे कार्य केले आहे. भाषिक शुद्धतेचे महत्त्व पटवून देताना, त्यांनी आपल्या भाषेत परकीय शब्दांची सरमिसळ होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
0 टिप्पण्या