जळगाव – शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट) परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली असून, यावर्षी डीएड, बीएड आणि एमएड अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांनाही परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, कारण काही विद्यापीठांचे निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याने केवळ २० दिवसांच्या अंतरामुळे हे विद्यार्थी पूर्वी परीक्षेपासून वंचित राहत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
अर्थात, या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (गुणपत्रक) मिळाल्यानंतर, उत्तीर्ण दिनांकापासून एका महिन्याच्या आत ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करणे बंधनकारक आहे. जर या मुदतीत गुणपत्रक सादर झाले नाही, तर उमेदवाराचा शिक्षक भरतीसाठीचा दावा ग्राह्य धरला जाणार नाही.
तसेच, या विद्यार्थ्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार असून, टेट परीक्षेतील गुण उघड केले जाणार नाहीत. त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल आणि उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झालाच पाहिजे, ही अट देखील कायम आहे.
tetexam2025, education news, maharashtra exam, finalyearstudents, bedded
0 टिप्पण्या