जळगाव – देशसेवेच्या कर्तव्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक आनंदाला बाजूला ठेवणाऱ्या जवानांचं नाव घेतल्यास, पाचोऱ्यातील खेडगाव नंदीचा रहिवासी मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचं नाव अग्रभागी येईल. मनोज यांनी नुकतेच 5 मे रोजी यामिनी रामचंद्र पाटील हिच्याशी थाटात लग्न केलं. 30 दिवसांच्या सुट्टीवर गावात आलेल्या मनोज यांचे वैवाहिक आयुष्य सुरू होताच देशसेवेचं कर्तव्य पुकारलं गेलं. आणि त्यांनी कोणताही विलंब न करता दुसऱ्याच दिवशी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला.
सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण स्थिती आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई कारवाई केली आहे. त्यामुळे सुट्टीवर असलेले जवानही तातडीने सीमेवर बोलावण्यात आले आहेत. त्यातच मनोज यांनाही पाचारण करण्यात आलं. 8 मे रोजी विवाहानंतर सत्यनारायण पूजेचं आयोजन होतं, पण मनोज यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं.
विशेष म्हणजे नववधू यामिनी हिनंही नवऱ्याला देशसेवेच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहन दिलं. पतीला निरोप देताना तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर अभिमानही होता. मनोज यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनीही देशसेवेसाठी मुलगा जात असल्याचा अभिमान व्यक्त केला. गावातील मित्रमंडळी, नातेवाईक मोठ्या संख्येने मनोजला निरोप देण्यासाठी जमले होते.
मनोज पाटील यांनी "कर्तव्य प्रथम" हे तत्त्व आयुष्यात जगून दाखवलं आहे. लग्नानंतरचा आनंद आणि संसाराची स्वप्नं मागे टाकून त्यांनी देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिलं. त्यांच्या या निर्णयानं समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण उभं राहिलं आहे.
0 टिप्पण्या