जळगाव - जिल्ह्यातील सतत वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ही स्थिती नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते, विशेषतः लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि हृदयविकारग्रस्त नागरिकांसाठी अधिक धोकादायक आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी नागरिकांसाठी खालील खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत:
तहान लागली नसली तरीही भरपूर पाणी प्यावे.
ORS, लिंबूपाणी, ताक, लस्सी, फळांचे रस इत्यादी घरगुती पेये सेवन करावीत.
टरबूज, खरबूज, संत्री, काकडी, द्राक्षे यांसारखी पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे खावीत.
हलके, सैलसर, सुती व फिकट रंगाचे कपडे घालावेत.
टोपी, छत्री किंवा टॉवेलचा वापर करुन डोके झाकावे.
दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
घरात पडदे लावून थंड वातावरण राखावे व रात्री खिडक्या उघडाव्यात.
www.mausam.imd.gov.in या संकेतस्थळावरून हवामानाची माहिती घेणे आवश्यक.
पालकमंत्री पाटील म्हणाले, “सध्या उष्णतेची तीव्रता लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.”
जिल्हा प्रशासन हवामान बदलांवर सतत लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.
0 टिप्पण्या